सप्रेम नमस्कार,
             जमीनविषयक  कायदे अतिशय गुंतागुंतीचे आहेत हे आपणा सर्वांना माहीतच आहे. जमीन, मग ती शेतजमीन असो किंवा शहरातील जागा असो, मोठ्या प्रमाणावर वादाचा विषय बनते. या संदर्भातील अनेक कायद्याची माहिती सर्वसामान्यांना नसते. वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये तर शेतजमीन व्यवहारांबाबत लाखो खटले प्रलंबित आहेत. अशा वेळी तर, शेतजमीन कायद्यांच्या निदान मुलभूत तरतुदी जरी माहिती असतील तर, कोणती कार्यवाही करावी लागेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल. 
                   
         याच हेतूने "सातबारा.को.इन" (satbara.co.in) हि वेबसाईट आम्ही बनविली आहे. हि वेबसाईट पूर्णपणे मराठीतून आहे. या वेबसाईटसाठीचे लिखाण, शेतजमिनींचा कायदेविषयक गाढा अभ्यास करणारे प्रशासक अधिकारी श्री. शेखर गायकवाड यांनी केले आहे. श्री. शेखर गायकवाड हे उच्चविद्याविभूषित असून त्यांनी कृषी विषयात एम.एस.सी. केले आहे. त्याशिवाय ते एम.ए. (समाजशास्त्र), एम.ए. (तत्वज्ञान), एल.एल.बी. आहेत. त्यांनी याच विषयासंबंधी  शेतकऱ्यांनो   सावधान, शेतीचे कायदे, गोष्टीरूप जमीन व्यवहार नीती, फेरफार नोंदी, महसूल अधिकाऱ्यांचे अर्धन्यायिक कामकाज, घरपोच धान्य योजना, शेतकऱ्यांनो जमीनी सांभाळा, कायदा  माहितीचा अन् अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा  अशी  आठ पुस्तके लिहिली आहेत. सन १९९९ साली व्याख्यानांव्दारे  , चर्चासत्राव्दारे, शेतकऱ्यांचे कायदेविषयक ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आकाशवाणी, दुरदर्शनवर त्यांनी ५० पेक्षा जास्त कार्यक्रमाव्दारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.